“ज्यांच्यावर संकट येतात ती माणसं नशीबवान असतात”
दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलगी पोलीस अकादमीच्या इतिहासात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ पदाचा मान मिळविणारी पहिली महिला अधिकारी !
मीना तुपे यांच्या महत्वाकांक्षा आणि मेहनतीला सलाम!
राज्याच्या पोलीस प्रबोधिनीच्या शंभर वर्षांहून अधिकच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुलीने देखील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब मिळवून हेच दाखवून दिले आहे. मुलगी शिकली तर आई-वडीलांचे नाव कसे उजळू शकते त्याचे हे उदाहरण! मीना तुपेच्या कामगिरीने बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा या छोटय़ाशा गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रबोधिनीत १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. लहानपणापासून शेतीची अंगमेहनतीची कामे करणाऱ्या मीनाला हे प्रशिक्षण त्यामुळे खडतर भासलेच नाही. कारण अगदी लहानपणापासून मीना शेतात नांगरणी, खुरपणी अशी सर्व कामे करत असे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेल्या मीनाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणाऱ्या या कुटुंबातल्या चार बहिणींमध्ये सर्वात लहान असणाऱ्या मीनाचे शिक्षिका होण्याचे स्वप्न होते.
त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. तिच्या आईचा मुलींच्या शिक्षणाला फारसा पाठींबा नसल्याने तिच्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. मात्र, मीनाने हट्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी अनेक ठिकाणी तिने पायपीट केली, मात्र हाती काही लागले नाही. शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे मिळेल ती नोकरी पत्करायची असे तिने ठरवले नोकरीच्या शोधात असलेल्या मीनाने पोलीस भरतीची जाहिरात पाहून त्यासाठी अर्ज केला. मीनाला हवालदाराची नोकरी मिळाली. मिळालेल्या नोकरीत झोकून देऊन मीनाने काम केले. खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिकही पटकावले. पण पोलीस हवालदाराची नोकरी करणे तिच्या बुद्धीला काही पटेना. तिच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे काम पाहून आपणही पोलीस अधिकारी पदावर काम करावे असे तिला वाटू लागले. तिने निश्चय केला आणि प्रयत्न सुरु केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची जय्यत तयारी केली आणि महिलांमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत मीना सर्वोत्कृष्ट ठरली. तिच्या सर्वोत्तम कामगिरीद्वारे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान तिने प्राप्त केला. मीना ही पोलीस अकादमीच्या इतिहासात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’पदाचा मान मिळविणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीचा नाशिकमध्ये दीक्षान्त समारंभ झाला, त्यात मीना यांना ‘स्वॉर्ड आॅफ आॅनर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
मीनाला मिळालेल्या यशामुळे तिच्यावर सर्वांकडूनच कौतुकाचा वर्षाव झाला. तिला मिळालेल्या यशाने तिच्या आई-वडिलांना जीवनाची सार्थकता झाल्याचे समाधान मिळाले. या तिच्या मिळालेल्या यशाचे गुपित काय असे विचारले असता ती काहीशा नाराज सुरात सांगते, “ परिस्थितीमुळे झालेली सामाजिक अवहेलना आणि अवमान यामुळे मी आतून पेटून उठायचे, काहीतरी करूनच दाखवेन अशी जिद्द मनात बाळगत मी परिस्थतीशी लढायचे ठरवले. लहानपणापासून आई वडीलांना सातत्याने कष्ट करताना पहिले होते. माझ्यासाठी प्रथम प्रेरणास्थान माझे आई-वडीलच आहे. प्रामाणिकपणे आणि सातत्याने खडतर मेहनत करणे हे मी त्यांच्याकडूनच शिकले. जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रयत्न करत राहिले, फळाची अपेक्षा केली नाही, मात्र माझे प्रयत्न अपयशी ठरणार नाही याची खात्री बाळगली आणि आज माझे हे यश तुमच्यासमोर आहे.”
बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची परिस्थिती सर्वांनाच ठाऊक आहे. जिथे आर्थिक विवंचनेतून नैराश्य येऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याच जिल्ह्यातून एका शेतकऱ्यांच्या मुलीने मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने पोलीस अकादमीच्या इतिहासात ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ पदाचा मान मिळवणे ही निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे. शेतकरी आत्महत्येविषयी मीनाशी बोलले असता, ती सांगते की, “भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती या विषयाला अग्रस्थानी स्थान दिले पाहिजे. शेतकरी आत्महत्या का करतो यावर खोलात जाऊन विचार केला पाहिजे. नुसती वरवर चर्चा करून काही साध्य होणार नाही. मुळात मानसन्मानाचं जीवन जगण्याचा त्याचाही सारखाच हक्क आहे. पण आजही शेतकऱ्याला अपेक्षित मानसन्मान मिळत नाही. समाजाकडून त्याची कुचंबना होत असते. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे”.
शेतकरी कुटुंबातल्या मुला-मुलींनीही केवळ शेतीवर अवलंबून न राहता स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे. त्यांना मार्गदर्शन करण्याची माझी योजना आहे. विशेषतः मुलींनीही आई-वडिलांचा खंबीर आधार बनायला हवे. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याला काही अर्थ नाही. शेतकरी कुटुंबातल्या मुलांना त्यांचे आई-वडिल करत असलेल्या कष्टाची जाण असली पाहिजे. त्यांचे कष्ट समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे आणि काहीतरी करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. कुटुंबियांचे पाठबळ मिळाले तर कोणीही शेतकरी आत्महत्या करण्यास धजावणार नाही.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें