एक अमेरिकन माणूस मेक्सिकोत सुटीवर जातो.
एका छोट्या शांत गावात. गावात एक सुंदर
झुळझुळती नदी असते. त्यात एक तरुण नावाडी
रोज दिसतो. मासेमारी करत असतो. शांत बसलेला
असतो.
एका दुपारी अमेरिकन त्या तरुणाला विचारतो, ‘‘हे
इतके सुंदर मासे पकडायला तुला किती वेळ
लागला?’’
तो मुलगा म्हणतो, ‘‘लागले असतील काही तास.’’
‘‘पण मग तू रोज काहीच तास का काम करतोस.
जास्त काम कर, जास्त मासे पकड.’’ - अमेरिकन
त्याला सांगतो.
‘‘पण हे एवढे मासे पुरेत. माझं आणि माझ्या
घरच्यांचं भागेल तेवढय़ात, मग जास्त पकडून काय
करू?’’ - तो तरुण विचारतो.
‘‘ते ठीक आहे, पण बाकीच्या वेळेचं तू करतोस
काय?’’
‘‘मी मस्त झोप काढतो. माझं छोटं मूल आहे,
त्याच्याशी खेळतो. बायकोबरोबर फिरायला जातो,
गप्पा मारतो. गावात चक्कर मारतो. मित्रांना भेटतो.
मस्त गप्पा होतात. सुख-दु:ख समजतात. कधीकधी
मी गिटार वाजवतो, गातो. चांदणं पाहतो.’’
हे सगळं ऐकून अमेरिकन वैतागतो. म्हणतो,
‘‘माझ्याकडे बघ, मी हार्वर्डमधून एमबीए केलं
आहे. मी उत्तम बिझनेस मॉडेल बनवून देऊ शकतो.
मी तुलाही एक मॉडेल बनवून देतो. एकदम फुकटात.
फक्त तुला रोज सकाळी लवकर मासेमारीला जावं
लागेल आणि बराच जास्त वेळ काम करावं लागेल.
मग म्हणजे तू जास्त मासे पकडून आणशील, ते
विकून तुला जास्त पैसे मिळतील.
मग तू मोठी बोट
विकत घेऊ शकशील! म्हणजे अजून जास्त मासे
पकडता येतील, त्यातून अजून जास्त पैसे मिळतील.
मग आणखी एक बोट घेशील, मग अजून जास्त मासे,
मग अजून एक बोट. बघ इमॅजिन करून बघ!’’
स्वत:च्याच बिझनेस प्लॅनवर खूश होत अमेरिकन
एक्सपर्ट बोलत होता.
मग अजून एक्साईट होऊन म्हणाला, ‘‘एखादा ट्रकच
घे मग, डायरेक्ट शहरात मासे पाठव. काही मासे तर
तू एक्सपोर्टही करू शकशील. काय सांगावं, तू एक
दिवस हे छोटं मेक्सिकन खेडं सोडून, थेट अमेरिकेत
लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क सारख्या शहरात जाऊन
राहशील. एक मोठा उद्योगपती होशील. बघ ना बघ,
केवढी मोठी स्वप्न तुझी वाट पाहत आहेत.’
हे सारं ऐकून थक्क झालेला मेक्सिकन तरुण म्हणाला,
‘‘पण हे सारं घडायला साधारण किती वेळ लागेल?’’
‘‘तू खूप मेहनत केलीस, तर १५-२0 वर्षांत हे स्वप्न
पूर्ण होऊ शकेल!’’
‘‘आणि मग पुढे?’’
‘‘मग पुढे काय, तू तुझ्या कंपनीचे शेअर्स विक,
अजून श्रीमंत हो.’’
‘‘पण त्या पैशाचं मी करू काय?’’
‘‘मस्त रिटायर्ड हो, काम कमी कर! एखादं नदीकाठी
फार्म हाऊस घे, जिथं तुला शांतपणे राहता येईल,
उशिरापर्यंत झोपता येईल, गिटार वाजवता येईल,
गाता येईल, सुखानं राहता येईल!’’
मेक्सिकन तरुण म्हणाला, ‘‘मग आत्ता मी काय
करतोय?’’
***
😝😝😝
मुद्दा काय, जरा स्वत:लाच नीट विचारा की,
आपल्याला नक्की काय हवंय? कशासाठी चाललीये
ही तगमग? काय सांगावं, जे तुम्हाला हवं, ते
तुमच्या हाताशी, तुमच्या जवळ असेल, पण कदाचित
तुम्हालाच ते दिसत नाही.
त्यामुळं प्लीज एकदा
विचारा स्वत:ला, मला नेमकं काय हवंय!!
Nice one. Keep it up. Want to see more such beautiful articles in near future.
जवाब देंहटाएं